आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाराशिव साखर कारखाना चौकशीच्या रडारवर?:शेतकऱ्यांचे शेअर्स बुडविल्यासह कारखाना कमी भावात खरेदी केल्याचा आरोप

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचा विश्‍वासघात करून शेतकऱ्यांचे शेअर्स बुडवून कारखाना बुडीत निघाल्याचे दाखवून वास्तविक किंमती पेक्षा कमी दराने खरेदी केल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अ्रॅड. सोपान ढोबळे यांनी शासनाकडे केली आहे. त्यामुळे आता पुढील काळात बाराशिव देखील चौकशीच्या रडारवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

वसमत तालुक्यातील टोकाई कारखान्यावर एफआरपीच्या प्रशनावरून जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा उपनिबंधक बोराडे व कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव मालेगावकर यांची समिती स्थापन करून चौकशी केली जात आहे. त्यामुळे वसमत तालुक्यातील कारखानदारीच्या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

त्यानंतर आता भाजपाचे औंढा तालुका उपाध्यक्ष ॲड. सोपान ढोबळे यांनी शासनाकडे निवेदन सादर केले आहे. यामध्ये बाराशिव सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीची सखोल चौकशीची मागणी केली आहे. यामध्ये बाराशिव कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे शेअर्स असतांना कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचे शेअर्स बुडवून कारखाना बुडीत निघाल्याचे दाखविल्याचा आरोप केला आहे. या शिवाय संचालक मंडळाच्या संगणमताने वास्तविक किंमती पेक्षा कमी किमती मध्ये कारखान्याची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची व शासनाची फसवणुक झाली असून या प्रकाराची सखोल चाैकशी करण्याची मागणी ॲड. ढोबळे यांनी केली आहे.

दरम्यान, या आरोपामुळे आता बाराशिव कारखाना देखील पुढील काळात चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकरणात शासनाकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे औढा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, सर्व प्रक्रिया उघडपद्धतीने झाली, बाराशिव कारखान्याची खरेदीची सर्व प्रक्रिया उघडपध्दतीने पार पडली आहे. अशा तक्रारीच्या गोष्टीबद्दल आपण बोलत नाही. तसेच कोणी तक्रार केली याची माहिती नाही असे दांडेगावकर यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...