आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली लोकसभेची जागा भाजपा लढविणार असून हि जागा जिंकणारच, असा दावा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदेसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कराड यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांचा पत्ता कट होणार असून यावेळी शिवसेनेची जागा भाजपा घेणार, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
फुटीनंतर खासदार शिंदे गटात
हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली, कळमनुरी, वसमत विधानसभा मतदार संघासोबतच हदगाव, उमरखेड, किनवट विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. सध्या या लोकसभा मतदार संघात भाजपाचे तीन आमदार असून शिंदे गटाचा एक आमदार तर राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस व शिवसेनेमध्येच लढत झाली. 2014च्या मोदी लाटेतही या ठिकाणी काँग्रेसने जागा पटकावली होती. त्यामुळे या जागेवर भाजपाचे विशेष लक्ष होते. मात्र मागील निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना-भाजपा युतीचे हेमंत पाटील यांनी विजय मिळविला. मात्र शिवसेनेच फुट पडल्यानंतर खासदार पाटील यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
भाजपचे स्थानिक पातळीवर नियोजन
दरम्यान, आता या लोकसभेवर भाजपने दावा सांगण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी भाजप मंत्री, प्रदेश पदाधिकारी हे या लोकसभा मतदार संघात येऊन आगामी निवडणुकीच्या निमित्ताने चाचपणी करत आहेत. जिल्हास्तरावर तसेच काही ठिकाणी स्थानिक पातळीवर भाजप नेते पोहोचू लागले आहेत.
भाजपकडून युवा चेहरा
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी हिंगोलीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. भाजपने काही लोकसभा जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये हिंगोली लोकसभेच्या जागेचा समावेश असल्याचे कराड यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी भाजप निवडणूक लढवून जिंकणारच, असा दावा त्यांनी केला. केंद्रीय राज्यमंत्री कराड यांच्या या वक्तव्याने राजकिय मंडळीच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटात यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट होणार का? याबाबत चर्चा सुुरु झाली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून युवा चेहरा म्हणून रामदास पाटील सुमठाणकर यांना संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपची रणनिती सुरू
हिंगोली लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने भाजपने रणनिती आखण्यास सुरवात केली आहे. सुरूवातीला केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांचा जिल्हा दौरा झाला. त्यानंतर भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ हिंगोलीत आल्या होत्या. आता राज्यमंत्री कराड येऊन गेले. तर पुढील आठवड्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत. मंत्री व नेत्यांच्या दौऱ्यातून आगामी निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरवात झाल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.