आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याने घरातील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून दिले तसेच बाजूच्या तीन घरांमध्येही चोरीचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. 19) सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे नव्याने बांधलेले निवासस्थान आहे. या ठिकाणी त्यांचा मुलगा शिवाजी मुटकुळे हे राहतात.
तोंडाला रुमाल लावून आले चोर
शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर मुटकुळे कुटुंबीय घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्याने लाकडी प्लायवूडचे कपाट तोडून त्यातील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून दिले. मात्र चोरट्याच्या हाती काहीही लागले नाही.
कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न
चोरट्यांनी ज्ञानबा मुटकुळे, नारायण मुटकुळे, भाऊराव मुटकुळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्यांनी भागवत खोरणे यांच्या शेतातील आखाड्यावरील दोन शेळीची पिल्ले चोरून नेले. दरम्यान आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळी पोलिसांची पाहणी
या प्रकरणात शिवाजी मुटकुळे यांनी तातडीने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक आर. एन. मळघणे, उपनिरीक्षक एम. एम. मुपडे, जमादार आशिष उंबरकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सीसीटीत चोरटा कैद
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता घरामध्ये एक चोरटा तोंडाला रुमाल बांधून आला असल्याचे स्पष्ट झाले मात्र इतर चोरट्यांबाबत सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाली नाही. त्यामुळे नेमके चोरट्या किती होते याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी उपाधीक्षक वाखारे पुढील तपास करीत आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.