आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपट्टी वसुलीसाठी हिंगोली पालिकेची धडक मोहीम:थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यास सुरुवात

प्रतिनिधी | हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेने आता धडक मोहिम हाती घेतली असून थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी गुरुवारी (ता. १९) सायंकाळपर्यंत तब्बल दोन लाख रुपयांची वसुली झाली आहे. संपूर्ण कर वसुली होईपर्यंत हि मोहिम सुरुच राहणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

थकबाकीदारांचा वाढता आकडा

हिंगोली शहराला सिध्देश्‍वर धरणावरून पाणी पुरवठा केला जात असून डिग्रस कऱ्हाळे येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. या ठिकाणी पाणी शुध्दीकरण करून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शहरात पाणी पुरवठ्यासाठी १३ हजार नळ जोडण्यात आहेत. पालिकेकडून पाणीपट्टीच्या वसुलीबाबत वारंवार आवाहन केले जात आहे. या शिवाय नागरीकांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रभागामधून कर वसुलीचे शिबीर देखील आयोजित केले होते. या शिबीरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पाणीपट्टीची नागरीकांकडून चालू देयक भरले जात नसल्याने थकबाकीचा आकडा वाढू लागला आहे.

13 हजार ग्राहकांकडे थकबाकी

दरम्यान, सध्याच्या स्थितीत शहरातील १३ हजार ग्राहकांकडे तब्बल ४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मार्च महिन्यापुर्वी कुठल्याही परिस्थितीत थकबाकी वसुली करून विज देयकाचा भरणा करणे गरजेचे आहे. विज देयक थकल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार केले जातात. त्यातून नागरीकांनाच त्रास होतो. त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे.

या मोहिमेत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, डी. पी. शिंदे यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थकबाकीदार ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यास सुरवात केली आहे. या मोहिमेत पहिल्याच दिवशी गुरुवारी ता. १९ सायंकाळपर्यंत तब्बल दोन लाख रुपयांची वसुली झाली आहे. तर पाच पेक्षा अधिक ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

नागरीकांनी पालिकेला सहकार्य करावे

पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले आहे की, मार्च महिन्यात विज देयकासाठी पाठपुरावा केला जातो. वेळेत विज देयक न भरल्यास विज पुरवठा खंडीत केल्यामुळे त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. पर्यायाने नागरीकांनाच त्रास होणार आहे. नागरीकांची संभाव्या अडचण लक्षात घेऊन पाणीपट्टीची वसुली मोहिम सुरु केली आहे. नागरीकांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी तातडीने भरून पालिकेचा सहकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...