आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावचर जोरदार टीकास्त्र डागले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपावर बेईमानीचे आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना सर्व खासदार व आमदारांची राजीनामे घेऊन निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. भाजप शिवाय त्यांचे किती उमेदवार निवडून आले हे त्यानंतर त्यांना कळाले असते. आम्हाला बेईमान म्हणणारे उद्धव ठाकरेच बेईमान आहेत. उद्धव ठाकरे यांनी हम दो ची भूमिका घेत स्वतः मुख्यमंत्री झाले व मुलाला मंत्रिपद दिले. ठाकरे यांनी निवडणुकीत विजयी न होता मुख्यमंत्रीपद घेऊन आयत्या बिळावर नागोबाची भूमिका घेतली, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे प्लस तर लोकसभा निवडणुकीत 45 प्लस उमेदवार विजयाचे प्रयत्न असून त्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयातून लढविल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत 45 प्लस तर विधानसभा निवडणुकीत दोनशे प्लस उमेदवार विजयाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात असून संघटनात्मक बांधणीही केली जात आहे. त्यासाठी कोअर समितीच्या बैठका घेतल्या जात आहेत. त्यातून त्या त्या जिल्ह्यासाठी काय हवे आहे हे जाणून घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच भाजप व्यतिरिक्त मतदार जोडण्यासाठी फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान राबवली जाणार आहे. या अभियानात केंद्र शासनाच्या राबविण्यात आलेल्या व सुरू असलेल्या योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थांना योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आघाडी सरकारवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, मागील अडीच वर्षाच्या काळात आघाडी सरकारने केंद्र शासनाच्या योजना अडवून ठेवल्या. केंद्राच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर त्याचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पर्यायाने भाजपला होईल यामुळेच आघाडी सरकारने हेतूपुरस्सर पणे योजना अडवल्याचा आरोप त्यांनी केला. आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्ष काचेच्या पिंजऱ्यातून बाहेर यायला तयार नव्हते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरेच बेईमान
शेतकऱ्यांला दिवसाही वीज मिळेल
शिंदे फडणवीस सरकारचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू सुरू आहे. पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच समृद्धी महामार्गाला सर्व जिल्हे जोडण्याबाबतचा आराखडा ही तयार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाटलांवर शाईफेक करणे योग्य?
निर्भया फंडातील वाहने इतरत्र वापरली असतील तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. तसेच गृहमंत्र्यांचा कायदा त्यांच्या मर्जीनुसार चालतो, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा ही बावनकुळे यांनी समाचार घेतला. पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यांवर शाईफेक करणे किती योग्य आहे हे किती योग्य आहे हे सुप्रिया सुळेंनाच विचारावे लागेल असेही त्यांनी सांगितले. हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, शिवाजी जाधव, युवती प्रदेश पदाधिकारी प्रगती होनराव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.