आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन:काही दिवसांत विविध विभागांतील 80 हजार पदे भरणार, शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार

हिंगोली | प्रतिनिधी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील विविध विभागांतील 80 हजार पदे येत्या काही दिवसांत भरणार व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संजय राठोड, आमदार गोपीकिशन बाजोरीया, माजी खासदार ॲड. शिवाजी माने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी नुकसानीची पाहणी केली आहे. देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल. राज्यातील विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने रिक्तपदे असून आगामी काही दिवसांतच विविध विभागांतील 80 हजार पदे भरली जाईल.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी न्यायालयात विधीज्ञांची फौज उभी केली जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम शिवसेना-भाजपा युतीचे सरकार करणार असल्याचे आश्‍वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

कामातून उत्तर देणार

बंडखोरीबाबत ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेवर शिंदे म्हणाले, मागील एका महिन्यापासून आम्हाला नवनवीन नावे देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही कामातून त्यांना उत्तर देणार आहोत. राज्यात ठिकठिकाणी जाताना हजारोंच्या संख्येने जनता दुतर्फा उभे राहून प्रसन्न मुद्रेने आमचे स्वागत करताहेत. हेच त्यांना उत्तर आहे.

5 कोटींचा निधी

दरम्यान, कळमनुरी येथील लमाणदेव तिर्थक्षेत्र, आदिवासी भवन यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा एकनाथ शिंदे केली. तसेच ,औंढा नागनाथ व नर्सी नामदेवच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच आमदार संतोष बांगर यांच्या कार्याचे त्यांनी कौतूक केले.

कावड यात्रेचे स्वागत

आमदार संतोष बांगर यांच्या वतीने कळमनुरी ते हिंगोली कयाधू अमृतधारा कावड यात्रा काढण्यात आली. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते. या कावड यात्रेचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

कळमनुरी ते हिंगोली कयाधू अमृतधारा कावड यात्रेत सहभागी झालेले भाविक.
कळमनुरी ते हिंगोली कयाधू अमृतधारा कावड यात्रेत सहभागी झालेले भाविक.
बातम्या आणखी आहेत...