आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोलीत वसमत तालुक्यातील रुखी शिवारातील कालव्यात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या दोन तासांत ओळख पटवण्यात हट्टा पोलिसांना यश आले आहे. मृतदेह हिंगोली येथील ज्ञानेश्वर सखाराम गव्हाणकर (40) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक तासात घरी पोहोचतोय, जेवण तयार करून ठेवा असा निरोप देणाऱ्या ज्ञानेश्वर यांचा मृतदेहच घरी आणावा लागल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
संपर्क साधला, पण...
हिंगोली येथील न्यू बंजारा कॉलनी भागात राहणारे ज्ञानेश्वर हे शुक्रवारी (ता.3) परभणी येथे कामासाठी गेले होते. त्याठिकाणी क्रेशरच्या मशीनचे फिटींग केल्यानंतर ते दुचाकी वाहनाने शनिवारी गावाकडे निघाले होते. रात्री नऊ वाजता त्यांनी हिंगोली येथे कुटुंबाशी संपर्क साधला. एक तासात पोहोचतोय, जेवण तयार करून ठेवा असा निरोपही दिला. मात्र रात्र होऊनही ते घरी परतलेच नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू करून सोशल मीडियावरही त्यांची माहिती दिली.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
दरम्यान, रविवारी (ता.5) सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह रुखी शिवारातील कालव्यात आढळून आला. हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, जमादार राजू ठाकूर, संदीप सुरुशे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जिल्हयातील पोलिस ठाण्यांना माहिती दिली तसेच सोशल मीडियावरही छायाचित्र प्रसिध्द केले. त्यानंतर गव्हाणकर कुटुंबियांनी रात्री मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह ज्ञानेश्वर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुचाकी वाहन व पैसे गेले कुठे?
मृत ज्ञानेश्वर यांच्याकडे दुचाकी वाहन व कामाचे सुमारे वीस हजार रुपये होते. कालव्यात त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या खिशात काहीही सापडले नाही. त्यामुळे कामाचे वीस हजार रुपये व दुचाकी वाहन गेले कुठे असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. पोलिसांनी आता दुचाकी वाहनाचा शोध सुरू केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.