आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेला असून काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता विलास गोरे यांना पुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र रविवारी ता. 13 काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाकडे पाठवण्यात आले आहे. पक्षनेतृत्वाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात सातव समर्थकांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. माजी खासदार राजीव सातव व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यातील गटबाजी सर्वश्रुत आहे.
त्यानंतर आता पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड व आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यामध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्तेही संभ्रमात सापडले आहेत. पक्षात उफाळून आलेली गटबाजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षासाठी अडचणीची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाच्या हिंगोली जिल्हा निरीक्षकांनी हिंगोली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव समर्थक व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थक यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यानंतर त्यांनी आमदार डॉ. सातव समर्थक असलेले जिल्हा प्रवक्ते विलास गोरे यांची थेट प्रदेश कार्यालयाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून गोरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.
पक्षांतर्गत नाराजीचा सूर
हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षामध्ये मागील 17 वर्षांपासून कार्यरत असलेले गोरे माजी खासदार सातव तसे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पक्ष निरीक्षकांच्या बैठकीमध्ये सुमारे दोनशे ते तीनशे कार्यकर्ते असताना केवळ गोरे यांच्यावर झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यात केवळ सातव समर्थकांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावरून दिसू लागले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्षाला गटबाजी भोवणार असल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.