आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात जिल्हा परिषदसह अनुदानित शाळांमधून समग्र शिक्षा अभियानांतर्गत २३. ७९ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमधूनही उत्सुकता निर्माण झाली आहे.
शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके दिली जातात. त्यासाठी उन्हाळी सुटीतच जिल्ह्यांच्या मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांत कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. मात्र आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने या वर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासूनच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार समग्र शिक्षा अभियान कार्यालयाने राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांना पत्र पाठवून जिल्हानिहाय पाठ्यपुस्तकाबाबत कळवले. त्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर पाठ्यपुस्तके पुरवठा होत आहे.
राज्यासाठी २७० कोटी रुपयांचा निधी होणार पुस्तकांसाठी खर्च
राज्यामध्ये १ कोटी ५६ लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. त्यासाठी २७० कोटी रुपयांचा निधी खर्च होणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अंध विद्यार्थ्यांसाठीही पुस्तके उपलब्ध
राज्यात समग्र शिक्षा अभियानांंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठीही पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या १२६, इयत्ता तिसरी ते पाचवीच्या ३२७, इयत्ता सहावी ते आठवीच्या ३१७ विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध केली आहेत. या विद्यार्थ्यांना ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी दिली जाणार आहेत.
मराठवाड्यात सर्वाधिक लाभार्थी विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यात, सर्वात कमी हिंगोलीत
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात ४.७६ लाख, बीड ३.५२ लाख, हिंगोली १.४९ लाख, जालना २.४९ लाख, लातूर ३.१४ लाख, नांदेड ४.११ लाख, उस्मानाबाद १.७८ लाख परभणी जिल्ह्यात २.५३ लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.