आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांडली येथे हाणामारीत जखमी झालेल्या वृध्दाचा मृत्यू:उत्तरीय तपासणीनंतर खुनाचा गुन्हा दाखल होणार, गावात पोलिस बंदोबस्त

प्रतिनिधी | हिंगोली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत जखमी झालेल्या वृध्दाचा रविवारी (ता. २२) मृत्यू झाला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतर खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे आखाडा बाळापूर पोलिसांनी सांगितले.

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे २८ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास २० ते २५ जणांच्या एका गटाने झोपेत असलेल्या काही व्यक्तींच्या घरावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काठ्यांसोबतच लोखंडी रॉडचा हाणामारीसाठी सर्रास वापर करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार राजीव जाधव, राजेश मुलगीर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

पोलिसांनी तातडीने तीन रुग्णवाहिका बोलून 10 जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या सर्वांवर उपचार करण्यात आले. मात्र पाच जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले होते. यामध्ये माजी तंटामुक्ती अध्यक्ष शेख तबदिल यांचा समावेश होता. त्यांना उपचार करून घरी आणले होते.

दरम्यान, आज सकाळी शेख तबदिल यांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी गावात भेट देऊन पाहणी ेकेली. गावात शांतता असून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. त्यांचा मृत्यू मारहाणीच्या जखमांमुळे झाला किंवा अन्य कारणामुळे झाला याबाबत वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतरच या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...