आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घरून पोळ्या, भाकरी आणत भाविकांनी घेतला दीडशे क्विंटल भाजीच्या महाप्रसादाचा लाभ

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील सारंगस्वामी मठात मंगळवारी (१७ जानेवारी) तब्बल दीडशे क्विंटल भाजीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाजी प्रसादाची ५२८ वर्षांपासून ही परंपरा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे सारंगस्वामी यांचा मठ आहे. त्या ठिकाणी दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भाजी प्रसादाचे वाटप केले जाते. मागील ५२८ वर्षांपासून हा प्रसाद वाटप केला जातो. यासाठी परिसरातील भाविक तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातील भाविकदेखील या यात्रेत महाप्रसाद घेण्यासाठी येतात. भाजी प्रसादाचे सेवन केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते, अशी आख्यायिका आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच भाविकांनी महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती. परिसरातील भाविकांनीही मिळेल त्या वाहनाने भाजी आणून दिली. कोबी, गाजर, सिमला मिरची, पालक, मेथी यासह विविध वीस प्रकारच्या भाज्या आणण्यात आल्या. दोन मोठ्या कढयांमधून भाजी शिजवण्यात आली. सायंकाळपर्यंत तब्बल दीडशे क्विंटल भाजी शिजवून प्रसाद वाटप करण्यात आला. हजारो भाविकांनी घरून पोळी, भाकरी आणून सारंगवाडी येथेच बसून भाजीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.

भाजी शिजवण्यासाठी पहाटेपासूनच तयारी प्रसादाची भाजी शिजवण्यासाठी पहाटेपासूनच तयारी सुरू केली जाते. दोन मोठ्या कढया आणून त्यामध्ये आणलेली भाजी टाकून त्याचा प्रसाद केला जातो. सर्व प्रकारच्या भाज्या एकच कढईमध्ये एकत्र करून शिजवून त्याचा प्रसाद वाटप केला जातो.

बातम्या आणखी आहेत...