आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजल जीवन मिशन अंतर्गत कामे चांगली करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंत्राटदारावर दबाव आणणे अपेक्षीत आहे, मात्र जिल्हयात सरपंचावरच कारवाईचा इशारा देणे चुकीचे असून जिल्हयातील सरपंचावर विनाकारण कारवाई केल्यास जिल्हयातील सरपंच संघटना प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा सरपंच संघटनेेचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव भवर यांनी गुरुवारी 'दिव्य मराठी'शी बोलतांना दिला आहे.
हिंगोली जिल्हयात जल जीवन मिशनची कामे संथ गतीने सुरु आहेत. जिल्हयात सुमारे ६६१ पैकी १ कामे पूर्ण करता आले आहे. या शिवाय अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट देण्याबाबत हस्तक्षेप केल्याची चर्चा सुरु आहे. याच कंत्राटदारांना गुणवत्तापूर्ण कामासाठी सरपंच, गावकरी पाठपुरावा करू लागले आहेत. मात्र काही कंत्राटदारांनी या प्रकरणात थेट अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून सरपंच, ग्रामसेवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत कामात अडथळा आणणाऱ्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या तर ग्रामसेवकांवर प्रशासकिय कारवाई करावी अशा सुचनाही यावेळी दिल्या. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे सरपंच संघटना व ग्रामसेवक संघटनेतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
या संदर्भात भवर यांनी सांगितले की, जल जीवन मिशनमध्ये शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गावात पुढील 30 ते 40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र काम निकृष्ठ झाले तर हा निधी पाण्यातच जाईल. त्यामुळे गावातील कामे चांगली करून घेण्याची जबाबदारी सरपंचाची आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांनी सरपंचांवर दबाव आणण्यापेक्षा कामांची तपासणी करून निकृष्ठ कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी. काही ठिकाणी सरपंच चुकीचे वागत असतील तर आम्ही समर्थन करणार नाही पण सरपंचावर विनाकारण कारवाई झाली तर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा भवर यांनी दिला आहे.
ग्रामसेवकांचा संबंधच नाही
जल जीवन मिशनची कामांचे कंत्राट पाणी पुरवठा विभागाकडूनच दिले जात आहे. तर कामेही त्यांच्यामार्फत केली जात आहे. यामध्ये ग्रामसेवकांकडून आडकाठी आणण्याचा प्रश्नच नाही. विनाकारण ग्रामसेवकांना बळीचा बकरा बनवू नये.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.