आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बालविवाह न रोखल्यास कारवाईचा बडगा; हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला थेट इशारा

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावात होणाऱ्या बालविवाहाची माहिती वेळेत न दिल्यास ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच, सदस्य सचिव अंगणवाडी सेविका, समितीतील सदस्य पोलिस पाटील, ग्रामसेवक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कृती दल व जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, कामगार अधिकारी टी. ई. कराड, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग व पोलिस विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, ग्रामपातळीवरील ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच, सदस्य सचिव अंगणवाडी सेविका, समितीतील सदस्य पोलिस पाटील, ग्रामसेवक यांनी आपापल्या गावात बालविवाह होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच गावात होणाऱ्या बालविवाहाची माहिती मिळताच तत्काळ चाइल्डलाइन १०९८ वर व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळविणे अपेक्षित आहे. आपणास बालविवाहाची माहिती असतानाही आपण ती माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास व ऐनवेळी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांना नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच चाइल्ड लाइनच्या १०९८ क्रमांकावर बालविवाहाची खोटी माहिती दिल्यास अशा व्यक्तीविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील तालुका, शहरी व ग्रामस्तरावरील शंभर टक्के बाल संरक्षण समित्याची तातडीने स्थापना करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

विधवा महिलांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा
विधवा झालेल्या शेतकरी महिलांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून त्यांना विहिरी मंजूर कराव्यात. तसेच कौशल्य विभागामार्फत विविध विषयांचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा. विधवा महिलांना सरकारी कामगार कार्यालयात शेतमजूर म्हणून नोंद करण्यासाठी ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...