आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hingoli
  • Fake Notes Worth 1.14 Crores Seized In Undha, Bing Burst When Police Got Away While Counting Money, 9 Arrested Including Three From Khamgaon

एक का तीन!:औंढ्यात 1.14 कोटीच्या नकली नोटा जप्त, पैसे मोजत असताना पोलिसांनी हटकल्याने फुटले बिंग, 9 ताब्यात

हिंगाेली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रक्कम तिप्पट करण्याचे आिमष दाखवून १० लाख रुपयांच्या बदल्यात औरंगाबादच्या महिलेच्या हातावर टिकवल्या ४० लाखांच्या बनावट नोटा

तिप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादच्या एका महिलेस एका टोळक्याने ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा हातावर टिकवल्या. हा सौदा औंढा नागनाथ येथे झाला. पैसे मोजत असतानाच आपणास गंडवल्याचे महिलेच्या लक्षात आले. परंतु त्याच वेळी गस्त घालणाऱ्या औंढा नागनाथ पोलिसांनी हटकल्याने हे बनावट नोटांचे बिंग फुटले. त्यानंतर औंढा नागनाथ पोलिसांनी एकूण १.१४ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. महिलेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी ९ जणांना ताब्यात घेण्यात आले. यात खामगावच्या तिघांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील एका महिलेची नांदेड व लातूर येथील विनोद शिंदे, केशव वाघमारे, विलास वडजे, सोमनाथ दापके, सुनील जगवार या पाच जणांसोबत ओळख होती. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. या वेळी पाच जणांनी त्या महिलेस १ लाख रुपयांचे तीन लाख रुपये देतो, असेे आमिष दाखवले. या महिलेने त्यासाठी १० लाख रुपये सोबत घेऊन बुधवारी १ फेब्रुवारी राेजी थेट नांदेड गाठले. त्या ठिकाणी उतरल्यानंतर ते एका वाहनाने औंढा नागनाथकडे निघाले होते, तर ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खामगाव येथून पाच जण फॉर्च्युनर गाडीने औंढा नागनाथकडे आले होते. औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीच्या आवारात या महिलेजवळील १० लाखांच्या नोटा फोर्च्युनर गाडीतील व्यक्तींना दिल्या. त्या बदल्यास गाडीतील व्यक्तींनी ४० लाखांच्या नोटांची बॅग त्यांच्याकडे दिली.

त्यानंतर फोर्च्युनरमधील व्यक्ती फरार झाल्या. औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयासमोर वाहन थांबवून त्यांनी नोटा मोजण्यास सुरुवात केली. या वेळी ती महिला वाहनाबाहेरच थांबली होती. दरम्यान, याच वेळी गस्तीवर असलेल्या औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वानाथ झुंजारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, रवी हरकाळ, अमोल चव्हाण यांनी त्या महिलेस हटकले. पोलिसांना पाहताच महिलेसोबतच वाहनातील पाच जणांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी महिलेकडे विचारणा केली असता तिने आपली फसवणूक झाल्याचे सांगितले व त्यांना देेण्यात आलेल्या ४० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटांची बॅग दाखवली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, व्हिडिओ कॉलिंगवरून त्यांची ओळख पटल्यानंतर खामगाव पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात ७५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा व बनावट सोने सापडले. त्यानंतर गुरुवारी पहाटे औंढा पोलिसांच्या पथकाने खामगाव येथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात नऊ जणांची चौकशी सुरू असून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठवाडा, विदर्भात नाकेबंदी
प्रकरणाची माहिती हिंगोली पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांना दिली. त्यानंतर मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नाकेबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या नाकेबंदीमध्ये खामगावचे उपअधीक्षक कोळी, उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या पथकाने फॉर्च्युनर वाहनासह ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड, लखन गोपाल बजाज, राहुल चंदुसिंग ठाकूर (सर्व रा. खामगाव) यांना ताब्यात घेतले.

औंढ्याकडे येताना अर्ध्या रस्त्यात सौदा फिस्कटला
नांदेडकडून औंढ्याकडे येताना महिलेचा वाहनातील व्यक्तींसोबतचा सौदा फिस्कटला होता. त्यामुळे ही महिला वसमत येथूनच परत नांदेडकडे निघाली होती. मात्र खामगावकडून येणाऱ्या पाच जणांसोबत पुन्हा बोलणी झाल्याने सौदा झाला अन् तिप्पट रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार महिलेने १० लाख दिले होते.

महिला-आरोपींचे वेगळे जबाब, ८ लाखांचा घोळ कायम
यामध्ये महिलेने १८ लाख रुपये दिल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितले, तर उर्वरित आरोपींनी १० लाख रुपयेच दिल्याचे सांगत महिलेस खोटे ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे आठ लाख रुपये गेले कुठे याचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. फॉर्च्युनर वाहनातील अन्य दोघांचाही पोलिसांनी शोध सुुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...