आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येहळेगाव येथील घटना:शेतकऱ्याची शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या; कर्जाला कंटाळून पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्रभर शेतात ऊसाच्या पिकाला पाणी देऊन घरी आलेल्या शेतकऱ्याने घरी चहा पिऊन पुन्हा शेत गाठले अन त्यानंतर शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. १० सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. रामदास गोपाळराव काळे (४७रा. येहळेगाव तुकाराम) असे शेतकऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येहळगाव तुकाराम येथील शेतकरी रामदास काळे यांना बेलमंडळ रोडवर तीन एकर शेत आहे. या शेतात सध्या ऊस व टाळकीचे पिक आहे. या शेतातील उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरी पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

दरम्यान, रविवारी (ता. ९) रात्री रामदास हे शेतात ऊसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्रभर पिकाला पाणी देऊन सकाळी ते घरी परतले. त्यानंतर घरी चहा पिऊन ते परत शेतात गेले. जेवणासाठी भाकरी घेऊन येण्याचे त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बाजूच्या शेतकऱ्यांना एक मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती गावकऱ्यांना व आखाडा बाळापूर पोलिसांना दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख अन्सार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत रामदास यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.