आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी संतप्त:शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना; तत्काळ कक्ष स्थापन करा, पीक कर्जाचे वाटप संथगतीने

हिंगोली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी विविध बँकांकडून पीक कर्ज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत. शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

पेरण्या तोंडावर आल्या असून काही ठिकाणी पेरणीची कामे आटोपली आहेत. मात्र त्यानंतरही हिंगोली जिल्ह्यांमध्ये केवळ २६ टक्के पीक कर्ज वाटपाचे काम झाले आहे. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी पापळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याबाबत अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पाचही तालुक्यांत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तहसील कार्यालयातील अधिनस्त कर्मचारी, बँकेचा एक जबाबदार कर्मचारी व सहायक निबंधक यांच्या कार्यालयाचा एक कर्मचारी यांची या कक्षात नियुक्ती करून शेतकऱ्यांच्या अर्जाच्या नोंदी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या कक्षामध्ये शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज मिळण्यासाठीच्या अडचणीचे अर्ज प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार व शुक्रवार या दिवशी स्वीकारण्यात यावेत, तर मंगळवारी प्राप्त झालेल्या अर्जावर शुक्रवारपर्यंत कार्यवाही करावी. तसेच शुक्रवारी प्राप्त होणाऱ्या अर्जावर मंगळवारपर्यंत कार्यवाही करावी. शक्य असल्यास तत्पूर्वी तत्परतेने निराकरण करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना बँकेकडून वेळेत पीक कर्ज मिळेल याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...