आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीत जुन्या वादातून दोन मुलांनी केला वडिलांचा खून; दोघांना अटक

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे जुन्या वादातून दोन मुलांनी वडिलांना मारहाण करून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणात पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलिस पोहोचल्याने खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी सोमवारी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील संजय आबाराव देशमुख व त्यांची दोन्ही मुले निखिल संजय देशमुख, गजानन संजय देशमुख यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. त्यातून छोट्या-मोठ्या कुरबुरी होत होत्या.

दरम्यान, शनिवारी (ता. ४) रात्री साडेसात वाजता निखिल देशमुख व गजानन देशमुख या दोघांनी त्यांचे वडील संजय देशमुख यांना काठीने व लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रविवारी दोन्ही मुलांनी संजय देशमुख यांना उपचारासाठी रिसोड येथे दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वाशीम येथे हलवले. त्या ठिकाणीही प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी अकोला येथे नेण्यास सांगितले. मात्र दोन्ही मुलांनी त्यांना अकोला येथे न नेता रात्री पानकनेरगाव येथे आणले. मात्र रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, सदर खुनाची घटना लपवण्यासाठी दोन्ही मुलांनी रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अंत्यविधीची तयारी केली. मात्र या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित भोईटे, सहायक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने रात्री पानकनेरगाव गाठले. पोलिसांनी मृत संजय देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. यामध्ये मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने त्यांचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. यावरून शिवाजी आबाराव देशमुख यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी निखिल संजय देशमुख व गजानन संजय देशमुख या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिस निरीक्षक भोईटे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...