आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमुद्र प्रवाहाच्या अर्थात अल-निनोच्या सक्रियतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणीटंचाई भेडसावण्याची भीती केंद्र व राज्य शासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या वर्षी पाण्याच्या बचतीसोबतच जुलै ते ऑगस्टपर्यंतचा विशेष टंचाई आराखडा तयार केला जात असून उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना याबाबत सूचना दिल्या आहेत. अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वेधशाळांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जून महिन्यानंतरही पाणीटंचाई निवारणार्थ उपायोजना आवश्यक ठरणार आहेत. तर उन्हाळ्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता असून उपलब्ध पाणीसाठ्यांचे बाष्पीभवन होईल. भूगर्भातील पाणीपातळीही खोल जाण्याची भीती असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे.
मोठी धरणे, लहान प्रकल्पांतून, तसेच लघू पाटबंधारे प्रकल्पांतून सिंचन व इतर उपाययोजनांसाठी नियोजित आवर्तनांचे पुनर्विलोकन करून संभाव्य पाणीटंचाईच्या उपाययोजनेसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील असे नियोजन करावे, अशा सूचना जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.
मान्सूनच्या आगमनावर परिणाम होण्याचा विविध वेधशाळांनी व्यक्त केला अंदाज, त्यामुळे शासन सतर्क शहरी भागांत पाणीकपातीचे नियोजन राज्यात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत टंचाई उपाययोजनेसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी स्रोत निश्चित करावेत, तसेच जिल्हानिहाय व तालुकानिहाय आराखडे तयार करावेत, एकही गाव, वाडी, तांडे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. शहरी भागांत वेळप्रसंगी पाणीकपातीचे नियोजन करण्याच्या सूचनाही महानगरपालिकांच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यातील पातळीवर लक्ष द्यावे, आपत्कालीन आराखडा तयार करावा, उष्णता वाढल्यास वन क्षेत्रात फायरलाईन्स निश्चित करण्याची तयारी करावी, अशा सूचनाही वन विभागाला देण्यात आल्या आहेत.
शासकीय याेजना जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंधारणासाठी विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्त शिवार, अटल भूजल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी स्रोत बळकटीकरण योजना मोहीम स्वरुपात राबवण्याच्या सूचना भूजल सर्वेक्षण यंत्रणा, मृद व जलसंधारण विभागाला देण्यात आल्या आहेत. “जल जीवन मिशन’अंतर्गत राज्यात सुरू असलेल्या योजना जून महिन्यापर्यंत पूर्ण होतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.
तलावाच्या परिसरातील विद्युतपंप काढणार तलाव, धरणाच्या परिसरात शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांनी बसवलेले विद्युतपंप काढले जाणार आहेत. हे पंप काढून घेण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. मात्र त्यानंतरही पंप सुरू ठेऊन पाण्याचा उपसा सुरू राहिल्यास पंप जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.
रोजगार उपलब्ध करून देण्यावर लक्ष
राज्यात संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे मंजूर करून मजुरांची मागणी आल्यानंतर तातडीने कामे सुरू करावीत व मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने यंत्रणांना दिल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.