आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत कपड्याच्या दुकानास आग:60 लाख रुपयांचे नुकसान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाजूच्या दुकानांना झळ नाही

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील महेश चौक भागातील कपड्याच्या दुकानाला मंगळवारी (ता. ७) मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे आगीची झळ इतर दुकानांना पोहोचली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हिंगोली शहरातील महेश चौक भागात महमद वसीमखान यांचे नॅशनल फॅशन रेडीमेड कपड्याचे दुकान आहे. या ठिकाणी सध्या सेल असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कपडे विक्रीसाठी आणण्यात आले होते. नेहमी प्रमाणे महमद वसीमखान हे मंगळवारी रात्री दुकानबंद करून घरी गेले होते. मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलास पाचारण केले. पालिकेच्या अग्निशमनदलाचे कर्मचारी, पोलिस तसेच नागरिकांनी आगीवर पाणी ओतून आग विझविली. मात्र, तोपर्यंत दुकानातील सर्व कपड्यांचे नुकसान झाले. काही कपडे जळून खाक झाले तर काही कपडे पाण्यात भिजल्यामुळे खराब झाले. पोलिस, पालिका प्रशासनाचे कर्मचारी व नागरिकांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्यामुळे बाजूला असलेल्या कपड्यांच्या दुकानाला आगीची झळ पोहोचली नाही.

दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, पालिका कर्मचारी बाळू बांगर, जमादार संजय मार्के यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आज दुपारपर्यंत नोंद झाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...