आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा:दाटेगाव व आवरगाव ग्रामपंचायतीला पहिला पुरस्कार, बोल्डावाडीला सांडपाण्यात व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव तर बीड जिल्ह्यातील अवरगाव ग्रामपंचायतीला पहिला पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील गावाला सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, स्वच्छता अभियान कक्षाचे रघुनाथ कोरडे, राजेश सरकटे, विशोर पडोळे, कठारे, राधेश्याम गंगासागर, श्यामसुंदर मस्के, महेश थोरकर यांनी प्रत्येक गावात स्वच्छतेबाबत जनजागृती केली आहे. गावकऱ्यांना स्वच्छतागृह बांधकाम सोबतच त्याचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन वृक्ष लागवड याची माहिती देऊन महत्त्व पटवून दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात स्वच्छता अभियान चळवळ गतीमान झाली आहे.

दरम्यान विभागीय उपायुक्त अनिलकुमार नवाळे , कृषी अधिकारी शिंदे, विभागीय कार्यालयातील विस्ताराधिकारी भुमरे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच गावांची तपासणी केली होती. यामध्ये गावांमध्ये स्वच्छतागृह बांधकाम व त्याचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन, वृक्षलागवड यासह गावात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी केली. त्यानंतर मराठवाड्यातील सर्व गावांचे तपासणीचा अहवाल आयुक्त कार्यालयात सादर केला.

त्यानुसार आयुक्त कार्यालयाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात विभाग स्तरावरील निकाल जाहीर केला असून यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिंगोली तालुक्यातील दाटेगाव तसेच बीड जिल्ह्यातील सावरगाव या गावांना पहिला पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील वांगी लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी या गावांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला असून लातूर जिल्ह्यातील घोटी बुद्रुक व परभणी जिल्ह्यातील गौर या गावाला तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

याशिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार हिंगोली जिल्ह्यातील बोल्डावाडी, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनाचा पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातील खेड तर शौचालय व्यवस्थापनाचा पुरस्कार औरंगाबाद जिल्ह्यातील हस्ता या गावांना जाहीर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...