आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा अभियानात हिंगोलीची बाजी:सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबाद विभागात प्रथम; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत सन्मान

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली नगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानामध्ये सलग दुसऱ्या वर्षी औरंगाबाद विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. 5) पालिकेने पुरस्कार स्वीकारला.

हिंगोली नगरपालिकेने वसुंधरा अभियानामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत. वृक्ष लागवड मध्ये हिंगोली पालिकेने पस्तीस हजार वर्षे लागवड करून त्याचे संगोपन केले आहे. यासोबतच घनकचरा व्यवस्थापनामध्ये पालिकेने घंटागाडीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातून दररोज कचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंड वर टाकला आहे. या ठिकाणी कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया देखील केली जात आहे.

यासोबतच नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी वेळोवेळी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली असून ब्लिचिंग पावडरचा देखील वापर केला जात आहे. पालिका मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले असून शहरातील करवसुलीसाठी प्रत्येक प्रभागात कॅम्प ही लावण्यात आले होते. यामध्ये पालिका कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करुन सकाळी दहा वाजेपर्यंत कर वसुली त्यानंतर कार्यालयीन कामकाज केले जात होते. त्यामुळे कर वसुली साठी कार्यालयीन कामकाजावर कुठलाही परिणाम झाला नाही.

दरम्यान शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेद्वारे नुकतीच हिंगोली पालिकेची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या पालिकांच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. यामध्ये हिंगोली पालिकेने औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

दरम्यान आज मुंबई येथे टाटा नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, आशिष रणसिंगे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव मनिषा म्हैसेकर, अशोक शिनगारे यांची उपस्थिती होती.

नागरिकांच्या सहकार्यामुळेच पुरस्कार

नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे म्हणाले की, हिंगोली नगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानामध्ये केलेल्या कामगिरीमुळेच औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. वृक्ष लागवड व इतर उपक्रमांमध्ये नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच पालिकेला यश मिळवता आले. नागरिकांनी यापुढेही पालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...