आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट झाल्याने चार जण भाजले, हिंगोलीतील घटना, एकाची प्रकृती गंभीर

प्रतिनिधी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीतील सेनगाव तालुक्यामध्ये हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट झाल्याने चार जण गंभीररित्या भाजले आहेत. शनिवारी (ता. 19) रात्री कहाकर बुद्रुक येथे ही घटना घडली. चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

शिट्टी लॉक झाल्याचे कळलेच नाही!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथे देवराव पोपळघट यांच्या शेतात हळद शिजवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संदीप पोपळघट यांनी त्यांच्या मालकीचे कुकर शेतात आणले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देवराव पोपळघट, संदीप पोपळघट, अजय अमृता खंदारे व कांबळे, असे चौघेजण यासाठी काम करत होते. त्यांनी कुकरमध्ये हळद व पाणी टाकले. कुकरखाली जाळ पेटवला. मात्र, यावेळी कुकर वर असलेली शिट्टी लॉक झाल्यामुळे वाफ बाहेर पडण्यास जागाच राहिली नाही. त्यामुळे काही वेळानंतरही कुकर तापले नाही, असे गृहीत धरून चौघेही कुकरपासून काही अंतरावर जेवणासाठी बसले. अर्धा तास पेक्षा अधिक काळ होऊन देखील शिट्टी झालीच नाही. अद्याप कुकरमधील पाणी तापले नाही असे समजून चौघेही निवांत जेवण करीत बसले.

फुटलेला सिलिंडर.
फुटलेला सिलिंडर.

मोठा आवाज आल्याने शेतकऱ्यांची धाव
मात्र कुकरमध्ये वाफेचा दाब येऊन कुकरचा स्फोट झाला. यामध्ये कुकरच्या तीनही टाक्या उडून बाजूला पडल्या. कुकरमधील गरम पाणी व हळद या चौघांच्या अंगावर पडली. यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान शेतामधून मोठा आवाज झाल्याने परिसरातील शेतकरी धावत घटनास्थळी गेले. त्याठिकाणी चौघेजण गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत दिसून आले. या चौघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये कांबळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवले. दोघे जण अकोला; तर एकास वाशीमला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...