आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागलपार्डी शिवारात जुगाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त:16 जणांवर गुन्हा, 6.68 लाख रुपयांचा ऐवज जप्त, 9 दुचाकी वाहनांचा समावेश

प्रतिनिधी | हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील बागलपार्डी शिवारात जुगाऱ्यांचे नेटवर्क कुरुंदा पोलिसांनी उद्ध्वस्त केले. आज कडाक्याच्या थंडीत पहाटे अडीच वाजता शेतात असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून अंदर-बाहर खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी १६ जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून ६.५८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत बागलपार्डी शिवारात मुख्य रस्त्यापासून एक किलो मीटर अंतरावर एका शेतात जुगार अड्डा सुरु आहे. रात्रीच्या वेळी पोलिस किंवा अनोळखी व्यक्ती आल्याची तातडीने खबर देण्यासाठी काही शेतांमधून शेकोटी करून बसलेले जुगाऱ्यांचे खबरे देखील आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धतुरे, जमादार तुकाराम आम्ले, आंबेकर, इमरान सिद्दीकी, राठोड, पांढरे, कोटकर यांच्या पथकाने पहाटे अडीच वाजता साध्या वेशात तसेच खाजगी जीप घेऊन बागलपार्डी शिवार गाठले. यावेळी जातानाच पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी शेतात शेकोटी करून बसलेल्या लोकांना ताब्यात घेतले. त्यामुळे त्यांना पोलिस आल्याची खबरही देता आली नाही.

त्यानंतर पोलिसांनी थेट अड्डयावर जाऊन छापा टाकला. अचानक पोलिस आल्याचे पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन काही जण पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर ९ दुचाकी वाहने, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा ६.५८ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी सुरेश हनमंते, उद्धव नरवाडे, किशन बेंडे, नागनाथ गवकोंडे, बालाजी बागल, गजानन पांडव, प्रमोद बागल, ऐजाज कुरेशी, पांडुरंग बेले, शहाजी बागल, बंडु बागल, गजानन पतंगे, रमेश बागल, बालु सवंडकर, गंगाधर दळवीसह एका विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...