आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पाहिजेत गटशिक्षणाधिकारी अन् मुख्याध्यापक, प्रा. वर्षा गायकवाड ;यांच्‍या विभागातील पदे रिक्त

मंगेश शेवाळकर | हिंगोली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड पालकमंत्री असलेल्या हिंगोली जिल्ह्यात शिक्षण विभागात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. आता १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होण्याची भीती व्यक्त होत आहे. रिक्त पदांसंदर्भात वारंवार निवेदने देऊनदेखील पदे भरली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८७० प्राथमिक शाळा असून २९ माध्यमिक शाळा आहेत. मात्र या शाळांमधून रिक्त पदांची संख्याच अधिक असल्याने शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. पाचही तालुक्यांमधून गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त असून या पदाचा पदभार विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. या शिवाय माध्यमिक शाळांमधून राजपत्रित मुख्याध्यापकांसह विषय शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ज्येष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळावा लागत आहे. तर इतर शिक्षकांनाच गणित व विज्ञान विषय शिकवावे लागत आहे. जिल्ह्यात शाळांमधून रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या अध्ययनस्तर निश्चितीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या केवळ ४७ टक्केच विद्यार्थ्यांना उतारा वाचन येत असल्याचे स्पष्ट झाले तर इयत्ता सहावी ते आठवीच्या ४७.२० टक्के विद्यार्थ्यांना स्वअभिव्यक्तीस्तर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गणित विषयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या ४६ टक्केच विद्यार्थ्यांना भागाकार येत असून इयत्ता सहावी ते आठवीच्या ४३ टक्के विद्यार्थ्यांना शाब्दिक भागाकार येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे पालकत्व असलेला हिंगोली जिल्हा असून या जिल्ह्यातच शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्याचे चित्र आहे. रिक्त जागा भरण्यासंदर्भात शासनाकडे वारंवार निवेदने पाठविण्यात आली. मात्र त्यावर निर्णय झालाच नाही. आता १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय दिसू लागले आहे.

हिंगोली जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागा 05 तालुक्यात (हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत) कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नाहीत.

85 उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पदे रिक्त. 50 केेंद्र प्रमुखांची पदे रिक्त. एकूण ६८ पदे आहेत. 19 राजपत्रित मुख्याध्यापकांची सर्वच्या सर्व पदे रिक्त. 06 अराजपत्रित मुख्याध्यापकांची पदे रिक्त. एकूण १० पदे आहेत.

....हे तर जिल्ह्याचे दुर्दैव
^शालेय शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये मोठ्या संख्येने रिक्त पदे असणे हे हिंगोली जिल्ह्याचे दुर्दैव आहे. गटशिक्षणाधिकारी, राजपत्रित मुख्याध्यापक, अराजपत्रित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे भरण्याबाबत वारंवार शासनाकडे निवेदन दिले आहेत. मात्र अद्यापही पदे भरली नाहीत. शासनाने हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत.
- व्ही. पी. फुलतांबकर, राज्य अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना.

बातम्या आणखी आहेत...