आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा हिसका:हिंगोलीतल्या नागेशवाडी शिवारात साडेसहा लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील औंढा नागनाथ ते शिरडशहापूर मार्गावर नागेशवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारसह साडेसहा लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 6) गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड येथून गुटखा हिंगोलीत आणला जात होता.

रात्रीचा कारनामा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथून एका कारमधून रात्रीच्या वेळी गुटख्याची पोती हिंगोली येथे आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार सुमीत टाले, शेख जावेद यांच्या पथकाने औंढा ते शिरडशहापूर मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली होती.

ताब्यात घेऊन विचारपूस

दरम्यान, रात्रीच्या सुमारास पोलिसांनी एका कार चालकास थांबवले. यावेळी पोलिसांनी कार चालक सय्यद अन्वर हुसेन याच्याकडे कारमधील पोत्याबाबत विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांना त्यास ताब्यात घेऊन कारमधील पोत्यांची तपासणी केली असता त्यात विमल, राजनिवास, गोवा गुटखा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कार व त्यातील गुटख्याची पोती असा 6.57 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

कोठून आणला गुटखा?

सहाय्यक पोलिस निरीक्षक मलपिल्लू यांनी कार चालकाची चौकशी केली असता त्याने सदर गुटखा नांदेड येथील देगलूरनाका भागातील गोल्डन जर्दा स्टोअर्स या दुकानातून आणल्याचे सांगितले. त्यावरून मलपिल्लू यांनी हट्टा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कार चालक सय्यद अन्वर हुसेन (रा. हिंगोली), तसेच नांदेड येथील शेख फहीम व शेख अकबर यांच्या विरुध्द हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...