आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळहळ:कळमकोंडा पाटीजवळ ऑटो-दुचाकीचा अपघात, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 1 ठार, सहा जखमी; तिघींची प्रकृती गंभीर

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरा ते बोल्डा मार्गावर कळमकोंडा पाटीजवळ शुक्रवारी (दि.12) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भरधाव ऑटोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा महिला जखमी झाल्या असून त्यांना कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देवराव मारोतराव मस्के (25. रा. सावंगा खुर्द (जि. यवतमाळ) असे मयताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील सहा महिला आज सकाळी ऑटोने हिंगोलीकडे येत होत्या. त्यांचा ऑटो कळमकोंडा पाटीजवळ आला असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ऑटोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील देवराव मस्के यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटोमधील सहा महिला जखमी झाल्या आहेत.

गावकऱ्यांच्या मदतीने उपचार

या अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार अरविंद राठोड, देविदास सुर्यवंशी यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

असा झाला अपघात

जखमींमध्ये संगिता अशोक माघाडे (37), सविता साहेबराव मगर (36), मंदाबाई नरसिंग शिंदे (45), संगिता रमेश मगर (40), सीमा सुरेश शिंदे (35), सुनीता दौलत मगर (37) यांचा समावेश आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद मेने, डॉ. ऐश्‍वर्या शिंदे, डॉ. अनिता जमदाडे, डॉ. पंचलिंगे यांच्या पथकाने जखमींवर उपचार केले. त्यापैकी तिघींची प्रकृती गंभीर असल्याने एका महिलेस नांदेड तर दोघींना पुढील उपचारासाठी हिंगोलीला हलवण्यात आले आहे. दरम्यान, मयत देवराव हे हे लग्नासाठी खापरखेडा येथे जात असतांना हा अपघात झाला आहे.