आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली शहरालगत रेल्वेरुळावर झोपलेल्या गतिमंद तरुणाचा वाहतुक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेने जीव वाचला असून पोलिसांच्या पथकाने शनिवारी ता. ८ रात्री साडेसात वाजता त्या तरुणाला सुखरूप घरी नेऊने सोडले. तरुणाला पाहताच त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पोलिसांचा बंदोबस्त
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली शहरातील रेल्वेगेटवर वारंवार वाहतुक ठप्प होते. रेल्वे गेल्यानंतर या ठिकाणावरून वाहने पुढे नेण्यासाठी वाहन चालकांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण होते. त्यातून किरकोळ अपघात देखील होतात. त्यामुळे पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी वाहतुक शाखेला सुचना देऊन 24 तास कर्मचारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, शनिवारी दुपारी चार वाजता रेल्वेरुळावर एक तरुण झोपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी वसंत चव्हाण यांनी तातडीने धाव घेऊन तरुणाला रेल्वेरुळावरून उठवले. त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तो गतिमंद असल्याचे दिसून आले.
त्यामुळे त्याच्या जवळ असलेल्या चिठ्ठीवरून संपर्क साधला असता तो तरूण शहरालगत पुष्प कॉलनीतील असून त्याचे नांव तुकाराम कुंडलीक मुकाडे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याचा नेमका पत्ता मिळाला नाही. त्यामुळे चव्हाण यांनी त्यास एका रिक्षात बसवून घरी पाठविले. मात्र, तो घराकडे न जाता काही वेळाने परत रेल्वेरुळावर येऊन झोपला.
सूटकेचा नि:श्वास
प्रकार लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी तातडीने वाहतूक शाखेशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना बोलावले. पोलिस कर्मचारी शेषराव राठोड, विलास सोनवणे, किरण चव्हाण संदीप खरबळ यांनी तातडीने रेल्वेरुळाकडे धाव घेतली.
पोलिसांनी त्याच्या जवळ असलेल्या आधारकार्डवरून तुकाराम याचा पत्ता शोधून त्याला त्याच्या आई व आजीच्या हवाली केले. तुकारामला पाहताच कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तरुणाच्या आई व आजीने पोलिसांचे आभार मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.