आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात असलेले 195 अतिक्रमण हटविण्यास आज सुरुवात झाली. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला, अतिक्रमण काढण्यास विरोध करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात 195 अतिक्रमणधारकांना महसूल प्रशासनाने नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वागवाड, पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, रविवारी पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज सकाळी अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी दोन तासाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून पालिकेकडून प्रत्यक्षात अतिक्रमण हटविल्यास सुरुवात करण्यात आली. तीन जेसीबी मशीन, दहा ट्रॅक्टर च्या मदतीने अतिक्रमण काढून साहित्य जप्त केले जात होते. तर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान अतिक्रमण काढण्यास शिवसेना ( ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अतिक्रमणधारक, पोलिस कर्मचारी, पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादलाही तोंड फुटले होते. काही ठिकाणी महिलांनीही अतिक्रमण काढण्यास विरोध केला. मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. या परिसरात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्यानंतर वीज कंपनीनेही अतिक्रमधारकांच्या निवासास्थानांचा वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली. हिंगोली शहरात सर्वच ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक जी श्रीधर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत. दरम्यान या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे जलेश्वर तलावाच्या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.