आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा कोलमडली असून मंगळवारी (ता. 3) रात्री अपघातातील दोन गंभीर जखमींना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे यांच्या सतर्कतेने वेळेत उपचार मिळाले मात्र, रुग्णांना नांदेड येथे नेण्यासाठी तब्बल दिड तासानंतरही रुग्णवाहिका आलीच नाही. अखेर खाजगी रुग्णवाहिकेद्वारे त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथील दिनकर नरवटे, नागनाथ काळे यांच्या दुचाकीचा हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर मंगळवारी रात्री अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी त्या मार्गाने येत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनीष आखरे यांनी तातडीने त्यांचे वाहन थांबवून जखमींना त्यांच्या वाहनातून उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघातातील दोघेही गंभीर जखमी असल्यामुळे शासकिय रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानुसार रुग्णांच्या नातेवाईकांनी बीव्हीजी कंपनीच्या 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला.
रात्री आठ वाजता संपर्क साधल्यानंतर रुग्णवाहिका थोड्याच वेळात पोहोचेल असा सांगितले जात होते. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत संपर्क साधूनही हेच उत्तर मिळत असल्याने अखेर रुग्णांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहिका बोलावून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले. शासनाकडून एकीकडे मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था असल्याचे सांगितले जात असतांना दुसरीकडे अपघात किंवा गंभीर प्रसंगाच्या वेळी रुग्णवाहिकाच येत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसून खाजगी रुग्णवाहिकेद्वारे न्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
या रुग्णवाहिकाच बंद करा ः मनीष आखरे
जिल्हयात अपघात किंवा गंभीर प्रसंगाच्या वेळी या रुग्णवाहिका वेळेवर येत नसतील तर त्यांचा उपयोगच नाही. त्यामुळे जिल्हयात धावणाऱ्या या सर्व रुग्णवाहिकांची चौकशी करावी. तसेच या रुग्णवाहिका बंद करून शासकिय रुग्णालयातच अधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून घ्याव्यात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.