आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोरेगाव ते सवना मार्गावर वळण रस्त्यावर दुचाकी अपघातामध्ये दोनजण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. रविवारी (ता. 15) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
विशाल भारत नायक (रा. सवना) व सुनील लक्ष्मण चौधरी (रा. बोरी, ता. जिंतूर) अशी मयतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सुनील लक्ष्मण चौधरी हे त्यांचे मित्र संदीप बालाजी शिंदे यांच्यासोबत शनिवारी सेनगाव तालुक्यातील सवना येथे नातेवाईकांकडे आले होते. दरम्यान, सुनील त्यांचा मित्र संदीप व त्यांच्या मामाचा मुलगा विशाल हे तिघेजण दुचाकी वाहनावर सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील यात्रेमध्ये गेले होते. यात्रेत फिरून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते परत सवना गावाकडे निघाले होते.
वळण रस्त्यावर अपघात
यावेळी गोरेगाव ते सवना मार्गावर असलेल्या वळण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये सुनील चौधरी व विशाल नायक यांचा मृत्यू झाला. तर, संदीप शिंदे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार श्याम उजगरे, बालाजी भोईनर, प्रमोद मार्कड, राहुल मेंदकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवले
पोलिसांनी जखमी संदीप शिंदे यास तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलवले आहे. मृतक विशाल व सुनील यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अद्यापपर्यंत गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.
सुनील चौधरी महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान
अपघातातील मयत सुनील चौधरी हा मुंबई येथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान असून तो दोन वर्षापुर्वीभरती झाला होता. सध्या तो चंद्रपूर येथे कार्यरत होता. नांदेड येथे परीक्षेच्या निमित्ताने तो सुट्टीवर आला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.