आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:हिंगोली शहरात भर दिवसा महिलेचे पन्नास हजार रुपये पळविले; पोलिसांकडून तपास सुरू

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील पोस्ट ऑफिस रोड भागामध्ये एका महिलेच्या बॅगला ब्लेड मारून चोरट्यांनी 50 हजार रुपये पळविल्याची घटना घडली असून याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी तारीख 12 गुन्हा दाखल झाला आहे, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागातील रहिवासी प्रमिला मावळे या आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी बँकेतून 50 हजार रुपयाची रक्कम काढली. सदर रक्कम व बँकेचे पासबूक त्यांनी बॅगमध्ये ठेवले त्यानंतर त्या पोस्ट ऑफिस रोड भागातील एका कटलरी दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी गेल्या.

त्या ठिकाणी साहित्य बघत असताना त्यांची बॅग खालच्या बाजूने फाटलेली दिसून आली. त्यामुळे त्यांनी बॅगची पाहणी केली असता बॅग खाली ब्लेड मारून चोरट्यांनी पन्नास हजार रुपयाची रक्कम व बँकेचे पासबूक पळविल्याचे दिसून आले.

या प्रकारामुळे घाबरलेल्या प्रमिला मावळे यांनी थेट हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली यावेळी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार संजय मार्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लकुळे, भगवान आडे, गजानन पोकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.