आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिरसम ते हिंगोली मार्गावर जोडतळा शिवारात सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी दागिन्यांचा डब्बा समजून जेवणाचाच डब्बा पळविल्याने दागिने व रोख रक्कम सुरक्षित राहिली.
या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यास सोमवारी ता. १ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नक्की झाले काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरसम येथे अभिजीत उदावंत यांचे सिरसम येथे सोने चांदीचे दुकान आहे. सोमवारी ता. १ आठवडी बाजार आटोपून दुकान बंद करून ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर हिंगोलीकडे निघाले होते. यावेळी सिरसम ते हिंगोली मार्गावर जोडतळा शिवारात दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली अन त्यांना खाली पाडले.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे अभिजीत घाबरून गेले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या जवळील डब्बा व तिजोरीच्या चाव्या पळविल्या. यावेळी चोरट्यांनी अभिजीत यांना दुचाकीवरून पाडून गडबडीत दागिन्यांचा डब्बा समजून जेवणाचाच डब्बा पळविला. त्यामुळे त्यांच्या जवळील दागिने व रोख रक्कम सुरक्षीत राहिली.
यानंतर अभिजीत यांनी जोडतळा शिवारातील गावकऱ्यांना व बासंबा पोलिसांना माहिती दिली. गावकरी तसेच पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्हि. डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, जमादार नाना पोले, घुगे, खंडेराव नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यापुर्वीच गावकऱ्यांनी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. तर अन्य एक जण फरार झाला.
या प्रकरणी अभिजीत उदावंत यांच्या तक्रारीवरून राजू गणेश पवार (रा. इंदिरनगर कळमनुरी), तौफीकखान पठाण (रा. उमरखेड) यांच्यासह अन्य एकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिासांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.