आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसात लागले लग्न VIDEO:वाकोडीत अवकाळी पावसामुळे चक्क छत्रीखाली लागले लग्न, भर पावसात मंगलाष्टक अन अक्षता पडल्या

हिंगोली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालु्क्यातील वाकोडी येथे भर पावसात वधु-वरांच्या डोक्यावर छत्री धरून विवाह सोहळा पार पडला. गुरुवारी दुपारी झालेल्या या सोहळ्यात पावसातच मंगलाष्टकेही झाली अन वधू वरांवर अक्षताही पडल्या. वादळी वारा अन पाऊस या परिस्थितीत गावकऱ्यांनी एकजूट दाखवून विवाह सोहळा पार पाडला अन वऱ्हाडी मंडळीचे आदरतिथ्यही केले.

हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे.अचानक वादळी वारे व पाऊस येत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. शेतात वाळत घातलेली हळद भिजली असून काढणीसाठी आलेले केळीचे पिकही नष्ट होऊ लागले आहे. तर आता या पावसाचा विवाह सोहळ्यांनाही फटका बसू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

भोजनासाठीची व्यवस्था

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील सुनील वानखेडे यांची मुलगी पुजा यांचा विवाह वाशीम जिल्हयातील अनसिंग येथील गणेश घोलप यांच्याशी ठरला होता. 4 मे रोजी दुपारी 12ः23 वाजता विवाह सोहळा आयोजित केला. त्यानुसार गावालगत असलेल्या शेतात सर्व व्यवस्थाही करण्यात आली. शामीयाना टाकण्यात आला तसेच भोजनासाठीची व्यवस्थाही शेतातच करण्यात आली.

गावकऱ्यांनी पावसातही मंडप सोडला नाही

दरम्यान, दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. यामुळे एकच गोंधळ सुरु झाला. वधू-वर मंडपात आले होते. या परिस्थितीत गावातील तरुणांनी मंडप धरून ठेवला. तर वधु-वरांच्या डोक्यावर छत्री व ताडपत्री धरून मंगलाष्टके सुरु झाली. वऱ्हाडी अन गावकऱ्यांनी पावसातही मंडप सोडला नाही. भर पावसात हा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीची गावातच भोजनाची व्यवस्था करून उर्वरीत सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले.