आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा शिवारामध्ये वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. शनिवारी(आज) दुपारी ही घटना घडली आहे. यामध्ये अन्य तीन महिला बालंबाल बचावल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथील पिराजी विठ्ठल चव्हाण (38) हे काही महिला मजुरांसोबत शेतात हळद काढणीच्या कामासाठी गेले होते. महिला मजूर टोपल्यामध्ये हळद गोळा करून देत होत्या तर पिराजी हे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये थांबून हळद भरत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली.
त्यामुळे महिला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या खाली जाऊन बसल्या तर पिराजी हे ट्रॉलीमध्ये थांबले यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने घाबरून गेलेल्या महिला ट्रॅक्टर ट्रॉली खालून बाजूला पळाल्या. यामध्ये एका महिलेचा हात भाजला गेला. काही वेळानंतर महिलांनी ट्रॅक्टर जवळ घेऊन पाहणी केली असता पिराजी यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना दिली तर औंढा पोलिसांनाही माहिती कळविण्यात आली.
औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वनाथ झुंजारे उपनिरीक्षक बाबासाहेब खार्ड, जमादार निवृत्ती बडे, गोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत पिराजी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथे आणला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे सुमारे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तर एक महिन्यापूर्वीच त्यांना मुलगा झाला होता. मयत पिराजी यांच्या पक्षात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.