आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टेबाज ताब्यात:औंढ्यात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 1.76 लाखांचा ऐवज जप्त

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ शहराजवळ आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या चौघांना स्थानिक गुुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 1.76 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सट्टेबाजांवर पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ शहरालगत एका बांधकामाच्या ठिकाणी काही जण आयपीएलवर सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्‍वर पायघन यांच्या पथकाने सोमवारी ता. १ रात्रीच्या सुमारास साध्या वेशात दुचाकी वाहनावर जाऊन छापा टाकला. यामध्ये चौघे जण एका ॲपवर आयपीएलचा सट्टा लावत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून ४ मोबाईल, दोन दुचाकी व रोख रक्कम असा १.७६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सचिन ग्यानबाराव उदगिरे, सतीष प्रभाकर सोनुने, प्रदीप सखाराम गोबाडे, मारोती उर्फ ओम राजकुमार सोनुने यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे, जमादार रवीकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी आता जिल्हाभरात सट्टा घेणाऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुुरु केले आहे. त्यासाठी विशेष पथकेही स्थापन करण्यात आल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.