आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहार खाल्याने 30 विद्यार्थ्यांना पोटदुखी!:वाटाण्यामध्ये आळ्या निघाल्याचे कारण, कडोळी जिल्हा परिषद शाळेतील घटना

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी ता. ५ दुपारी विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन खाल्यानंतर पोटदुखीचा त्रास सुरु झाला. यामध्ये ३० विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीने गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. तर उर्वरीत विद्यार्थी शाळेच्या मैदानामध्ये बसविण्यात आले आहेत.

कडोळी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून या ठिकाणी २४० विद्यार्थी शिक्षण घेतात. नेहमी प्रमाणे आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शाळेत मध्यान्ह भोजनामध्ये वाटण्याच्या ऊसळ देण्यात आली. मात्र ऊसळ खाल्यानंतर एका विद्यार्थीनीला उलटी झाली अन तिला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यानंतर शाळेतील सुमारे ३० विद्यार्थ्यांना पोटदुखी व मळमळ होण्याचा त्रास सुरु झाला.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या तक्रारी नंतर शाळा प्रशासनाने तातडीने गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर 30 जणांना उपचारासाठी गोरेगाव येथे हलविण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पालकही शाळेत दाखल झाले. पालकांनी शाळा प्रशासनाच्या कारभाराबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली. वाटाण्यामध्ये आळ्या निघाल्यामुळेच विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

पोषण आहारावर प्रश्नचिन्ह!

गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष गिरी यांच्या पथकाने विद्यार्थ्यांवर उपचार सुरु केले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. गिरी यांनी सांगितले. याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता पोषण आहार घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला होता.

विद्यार्थ्यांना त्रास नाही

सुरवातीला एका विद्यार्थीनीला त्रास झाला त्यानंतर 30 जणांना त्रास सुरु झाल्यानंतर उपचारासाठी गोरेगाव येथे दाखल केले आहे. उर्वरीत विद्यार्थी शाळेच्या मैदानात बसविण्यात आले असून त्यांना कुठल्याही प्रकाराचा त्रास नसल्याचे सांगण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकारी कडोळी येथे रवाना

या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तालुकआरोग्य अधिकारी डॉ. सतीष रुणवाल यांच्यासह वैद्यकिय पथक गावात रवाना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...