आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटातटाचे राजकारण:हिंगोलीत काँग्रेसकडून दोन वेळा फोडले फटाके, कर्नाटकच्या विजयापेक्षा दोन गटाच्या जल्लोषाचीच चर्चा

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा जल्लोष शनिवारी ता. 13 दुपारी साजरा करण्यात आला. मात्र या जल्लोषातही काँग्रेसचे दोन गट पडल्याचे चित्र होते. एका गटाने राष्ट्रवादीच्या सोबत येऊन फटाके फोडले तर दुसऱ्या गटानेही फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. कर्नाटकच्या विजया पेक्षा काँग्रेसच्या दोन गटाचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

हिंगोली जिल्हयात काँग्रेसमध्ये माजी खासदार राजीव सातव यांचा एक गट तर हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा दुसरा गट आहे. या दोन्ही गटामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात होते. मात्र माजी खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर त्याच्या पत्नी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी सातव गटाची कमान सांभाळली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये माजी खासदार राजीव सातव समर्थक तिसरा गट स्थापन झाला आहे. या गटाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क वाढविल्याने राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. काँग्रेसमधील गटाचे राजकारण मिटविण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. या यशाबद्दल हिंगोलीत महात्मा गांधी चौकात काँग्रेसच्या एका गटाने फटाके फोडले. यावेळी काँग्रेसचे नेते सुरेश सराफ, बाजार समिती संचालक शामराव जगताप, माजी नगरसेवक अनिल नेनवाणी, बापुराव बांगर, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख, मिलींद उबाळे, माबूद बागवान, आरेफ लाला, बासीत मौलाना यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या गटानेही फटाके फोडले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, भास्करराव बेंगाळ, पवन उपाध्याय, रणजीत पाटील गोरेगावकर, नामदेवराव पवार, आबेद अली, शिवाजी जगताप, मदन शेळके, राजू भाकरे, फेरोज लाला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे कर्नाटकच्या विजया पेक्षा काँग्रेसच्या दोन गटाने साजरा केलेला आनंदोत्सव जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला आहे.