आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवड योजना:वन विभागाच्या दुर्लक्षाने वृक्षलागवड गाळात फसणार, 59 लाख उद्दिष्ट असताना 4 लाख रोपांचीच निर्मिती होणार

हिंगोली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्षलागवडीसाठी रोपांच्या उपलब्धतेचा सर्वात मोठा स्त्रोत असलेल्या वन विभागाकडूनच रोपांच्या निर्मितीमध्ये दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे 59 लाख रोपे लागवडीचे उदिष्ट असतांना वन विभागाकडून केवळ 4 लाख रोपांचीच निर्मिती होणार असल्याने हिंगोली जिल्हयात वृक्ष लागवड योजना गाळात फसणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

हिंगोली जिल्हयात यावर्षी पावसाळ्यामध्ये तब्बल 59 लाख वृक्ष लागवडीचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग, सामजिक वनीकरण विभागामार्फत तसेच ग्रामपंचायतीमार्फत हमी योजनेच्या कामातून रोपवाटीका तयार करून रोपांचे उपलब्धता करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हयात वृक्ष लागवडीचे उदिष्टपूर्ण करण्यासाठी बैठकांनाही ऊत आला आहे. या बैठकांमधून केवळ उदिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात आहे.

4 लाख रोपे उपलब्ध होणार

दरम्यान, वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्धतेचा सर्वात मोठा स्त्रोत असलेल्या वन विभागाकडूनच यावर्षी रोपे निर्मितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. वन विभागाने केवळ तीन ठिकाणीच रोपवाटीका तयार केल्या आहेत. त्यातही एक रोपवाटीका कर्मचाऱ्याच्या गावात देण्यात आली असून दोन रोपवाटीकांमध्ये एक वसमत तालुक्यात तर एक कळमनुरी तालुक्यात देण्यात आली आहे. या रोपवाटीकांच्या माध्यमातून 4 लाख रोपे उपलब्ध होणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हरताळ फासला

मात्र या ठिकाणी असलेल्या बहुतांश रोपवाटीका केवळ निधी खर्चासाठीच उभारण्यात आल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 59 लाख रोपे लागवडीचे उदिष्ट असतांना वन विभागाकडून केवळ 4 लाख रोपे मिळणार असल्याने उर्वरीत 51 लाख रोपे आणायचे कुठून असा प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळे शासनाच्या वृक्ष लागवड योजनेला हिंगोली जिल्हयात हरताळ फासला जाणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

वारंगा भागात खड्डे जेसीबीने

कळमनुरी तालुक्यातील वारंगा भागात रोपे लागवडीसाठी खड्डे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी मजूरांच्या माध्यमातून खड्डे खोदकाम करणे अपेक्षीत असतांना जेसीबीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मजूरांच्या हाताला कामच मिळाले नाही. तर काही ठिकाणी मजूरांची नांवे टाकून मस्टर काढण्यात आल्याचा आरोप केला जात असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

घनदाट वृक्षलागवडीसाठी जेसीबीने खड्डे

वारंगा भागात घनदाट वृक्षलागवडीसाठी जेसीबीद्वारे खड्डे खोदले आहेत. मात्र इतर ठिकाणी मजूरांच्या सहाय्याने खड्डे खोदकाम झाले आहे. तर वन विभागाच्या रोपवाटीकांच्या माध्यमातून ४ लाख रोपांची निर्मिती होणार आहे.