आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत धान्य देतो म्हणत स्प्रे मारून वृद्धेस लुटले:दागिने व रोख रक्कम पळवली, हिंगोलीत गुन्हा

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील मोंढा भागात मोफत धान्य मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेला बाजूला नेत तोंडावर स्प्रे मारून अंगावरील दागिने व रोख ४० हजार रुपये पळवल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी (१८ जानेवारी) सायंकाळी गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील येडूद येथील द्वारकाबाई बळीराम भुक्तार (६५) या मंगळवारी हिंगोली येथे बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. तुम्हाला मोफत धान्य मिळते, त्यासाठी कागदपत्रे देतो, असे सांगून त्यांना बाजूला नेले. त्यानंतर त्यांच्या तोंडावर स्प्रे मारला. यामुळे द्वारकाबाई बेशुद्ध झाल्या. या वेळी त्या दोन तरुणांना त्यांच्या अंगावरील चांदीचे दागिने, हातातील चांदीचे कडे तसेच त्यांच्याजवळ असलेली ४० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. दरम्यान, अर्धा ते एक तासानंतर द्वारकाबाई शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पैसे शोधले, मात्र त्यांच्याजवळील पैसे पळवल्याचे लक्षात आले. अंगावरील दागिने व मोबाइलदेखील नव्हता. या प्रकारामुळे घाबरलेल्या द्वारकाबाई यांनी गावी जाऊन कुटुंबाला घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घेऊन आज हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी द्वारकाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, सहायक पोलिस निरीक्षक गिरी, जमादार वामन पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न चालवला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गिरी पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...