आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कर्मचाऱ्यांच्या छळ प्रकरणात ‘पॉलिटेक्निक’च्या प्राचार्यांची चौकशी:तीनसदस्यीय पथक हिंगोलीत दाखल

हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ चालवल्या प्रकरणात प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तीनसदस्यीय पथकाने गुरुवारी शासकीय तंत्रनिकेतन येथे येऊन सर्व प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राचार्य डॉ. उपाध्याय यांनी मागील काही दिवसांपासून मनमानी कारभार चालवल्याच्या तक्रारी होत्या. महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा मानसिक छळ केला जात असल्याच्या तक्रारी होत्या. महिला प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत बोलणे, वारंवार अपमानित करणे, उद्धट वर्तन करण्याचे प्रकार सुरू होते. याला कंटाळून प्राध्यापिकांनी तसेच महिला कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यात थेट राज्य महिला आयोगाकडे तसेच उच्च व तंत्रशिक्षण संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. चौकशीसाठी प्राचार्य ए. एम. जिंतूरकर (औरंगाबाद), प्राचार्य जी. व्ही. गर्जे (नांदेड), प्राचार्य ए. ए. आगरकर (अंबड) यांच्या समितीने गुरूवारी महाविद्यालयास भेट दिली.

डॉ. उपाध्याय गैरहजर या समितीने हिंगोलीत येण्यापूर्वीच प्राचार्य डॉ. उपाध्याय यांना कार्यालयात हजर राहण्याबाबत कळवले होते. मात्र त्यानंतरही आज प्राचार्य उपाध्याय गैरहजर होते. त्यामुळे त्यांचा जवाब नोंदवता आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात प्राचार्य डॉ. उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला. परंतु प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

फटकारल्याची चर्चा शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये कंत्राटदाराचे देयक रोखून धरण्यात आले होते. त्यानंतर कंत्राटदाराच्या नातेवाइकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे कंत्राटदाराने एका लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली होती. त्या लोकप्रतिनिधीने महाविद्यालयात जाऊन प्राचार्य उपाध्याय यांना फटकारल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...