आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीच्या साई रिसॉर्टला ग्राहक मंचाचा दणका:बुकींगसाठी दिलेली 50 हजार रुपयांची अनामत रक्कम दंडासह परत देण्याचे आदेश

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील साई रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने बुकिंगसाठी दिलेली 50 हजार रुपयांची अनामत रक्कम नऊ टक्के व्याजासह तक्रारदारास परत करण्याचे आदेश हिंगोली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

यासंदर्भात अॅड. पवन भन्साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील हेमंत कल्याणे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाकरिता साई रिसॉर्टचे व्यवस्थापक रवी नेनवानी यांच्या 50 हजार रुपयांची अनामत रक्कम देऊन ता. 5 मार्च 2021 रोजी साई रिसॉर्ट मंगल कार्यालय बुक केले होते. परंतु कोरोनामुळे जिल्हाप्रशासनाने सर्व परवानगी रद्द केल्यामुळे कल्याणे यांना नाईलाजास्तव त्यांच्या राहत्या घरी लग्न कार्यक्रम आटोपावा लागला होता.

त्यामुळे त्यांनी व्यवस्थापक रवी नेनवानी यांना दिलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी कल्याणे यांची विनंती फेटाळून पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी अॅड. पवन भन्साळी यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली.

सदर प्रकरण हिंगोलीच्या मंचाचे अध्यक्ष आनंद जोशी व सदस्य जे. ए. सावळेश्वरकर यांच्या समोर सुनावणी साठी आले होते. मंचाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून साई रिसॉर्टचे व्यवस्थापक रवी नेनवानी यांनी 50 हजार रुपयांची अनामत रक्कम ता. 5 मार्च 2021 पासून 9 टक्के व्याजाने परत करावे तसेच नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून 12000 रूपये कल्याणे यांना देण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणात तक्रारकर्ते कल्याणे यांच्यावतीने अॅड. पवन भन्साळी यांनी काम पाहिले तर त्यांना अॅड. बलदीपकौर अलग यांनी सहकार्य केले.