आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहरातील आळ्यानंतर अन्न औेषध प्रशासनाला आली जाग:धान्याचे नमुने तपासणीसाठी घेतले; कडोळी येथील प्रकरण

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहारात आळ्या निघाल्याच्या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाला जाग आली असून औषध निरीक्षकांनी तातडीने कडोळी येथे येऊन धान्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तर दुसरीकडे शिक्षण विभागानेही या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

कडोळी येथील जिल्हा परिषद शाळेतील 30 विद्यार्थ्यांना पोषण आहार खाल्यानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. पोषण आहारात देण्यात आलेल्या वाटाण्याच्या ऊसळीमध्ये आळ्या असल्याचे दिसल्यानंतर विद्यार्थ्यासह पालकांमधून मोठी खळबळ उडाली होती. तर शाळा प्रशासनानेही तातडीने गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून पोटदुखी होत असलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी गोरेगाव येथे नेले होते. सायंकाळी उशीरापर्यंत या सर्व विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी परभणी येथून थेट कडोळी गाठत शाळेत पाहणी केली. यावेळी शाळेत शिजविलेल्या धान्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या शिवाय किचनरुम मध्ये असलेल्या वाटाणे, तांदूळ व इतर धान्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या शिवाय धान्य साठविण्याबाबत आवश्‍यक सुचनाही शाळा प्रशासनाला दिल्या आहेत.

या सोबतच शिक्षण विभागानेही या प्रकाराची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून धान्य किती आले होते, कधी आले होते धान्य नमुन्यांची तपासणी केली होती काय याची माहिती घेण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाच्या अहवालामध्ये कोणाचा निष्काळजीपणा आहे हे स्पष्ट होणार आहे.

हिंगोली जिल्हा निर्मितीनंतरही अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज परभणी येथूनच पाहिले जाते. त्यामुळे भेसळ नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाला वेळ काढून हिंगोलीत यावे लागत असल्याचे चित्र आहे.

दोन महिन्यानंतर अहवाल येणार

या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी धान्य नमुने तपासणीसाठी घेतल्याचे सांगितले. तर या नमुने तपासणीचा अहवाल येण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचेही स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...