आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशाभूल:दारूची दुकाने सुरू असल्याची चुकीची माहिती देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल, वसमत पोलिसांची कारवाई

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात दारुविक्रीची दुकाने निर्धारित वेळेतही सुरु आहेत अशी खोटी माहिती देणाऱ्या व्यक्ती विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात आज (मंगळवार) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मोबाईल धारकाचा शोध सुरु केला आहे.

चुकीची माहिती देत दिशाभूल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरात तसेच परिसरात बीअर बार व इतर दारुची दुकाने निर्धारित वेळेच्या व्यतिरिक्त अद्याप पर्यंत सुरु असल्याची माहिती एका व्यक्तीने त्याच्या भ्रमणध्वनीवरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून दिली. त्यानुसार पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांना तातडीने तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यावरून पोलिस निरीक्षक कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख हकीम, जमादार भगीरथ सवंडकर यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या वेळी सर्व बिअरबार तसेच मद्यविक्रीच्या दुकानांना भेट देऊन पाहणी केली असता सर्व दुकाने बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांना देण्यात आली.

गुन्हा दाखल

या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारे यांनी आज वसमत शहर पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीधारकाविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांना हेतूपुरस्सर खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्या व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आता त्या भ्रमणध्वनीधारकाचा शोध सुरु केला आहे.