आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोलीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर मंगळवारी (ता.14) दुमदुमला होता. कर्मचारी कार्यालयात हजर नसल्यामुळे शासकिय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातही संपाचा परिणाम जाणवू लागला आहे.
आंदोलनाचे हत्यार उपसले
राज्यभरात जुन्या पेश्नन योजनेविषयी वातावरण तापले असताना हिंगोलीतही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील सन 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी शासन स्तरावर वेळोवेळी निवेदन देण्यात आले.
मुंबई येथेही आंदोलन करण्यात आले मात्र त्यानंतरही शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरातील सर्वच कर्मचारी संघटना आजच्या संपात सहभागी झाल्या आहेत.
आरोग्य कर्मचारीही सहभागी
आरोग्य कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाले असून केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेचा कारभार सुरू आहे. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना सेवा देताना कंत्राटी कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत असल्याचे चित्र आहे.
हिंगोली येथे महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कदम जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी आजच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे.
प्रमुख मार्गांवरून रॅली
आज सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेसमोर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बांगर, अविनाश दराडे, गिरीराज बोथीकर, सुनील गुठे, नागेश पुजारी, हरीश घुगे, प्रवीण काळबांडे, संदीप अन्नदाते, युसुफ शेख यांच्यासह कर्मचारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्रित आले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर हिंगोली शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयामध्येही कर्मचारी नसल्यामुळे या कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.