आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
गुरुवारी (ता. २) पहाटे ही घटना घडली. प्रकाश यादवराव सरकटे (वय ४०) असे शाखा व्यवस्थापकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जवळाबाजार येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा असून या ठिकाणी प्रकाश सरकटे हे जुलै २०२२ पासून शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. जवळाबाजार येथे ते पत्नी, एका मुलीसह किरायाच्या घरात राहात होते.
मात्र, मागील काही दिवसांपासून प्रकाश सरकटे अस्वस्थ होते, अशी माहिती आहे. बुधवारी (ता. १) रात्रीच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपले होते. मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास प्रकाश हे लघुशंकेच्या बहाण्याने उठले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते लघुशंकेवरून आले नसल्याने त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांनी तातडीने बाजूच्या खोलीत पाहिले असता प्रकाश यांनी झोक्याच्या दोरीला गळफास घेतल्याचे दिसून आले.
याप्रकारानंतर पत्नीने ताबडतोब घरमालकांना व शेजाऱ्यांनी माहिती देऊन मदतीसाठी बोलावले. मात्र, तोपर्यंत प्रकाश यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक सतीष तावडे, जमादार राजेश ठाकूर, सुर्यकांत भारशंकर, आंबादास बेले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मयत प्रकाश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मयत प्रकाश हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यांच्यावर नांदेड येथील तज्ज्ञांकडून औषधोपचारदेखील सुरु होते. मानसिक तणावाखाली येऊनच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत हट्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.