आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेनगाव तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात शेतात हरभरा पिक झाकत असताना विज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. विलास शामराव गव्हाणे (40, रा. शिंदेवाडी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने पत्नी व दोन मुले दुर अंतरावर असल्याने ते बालंबाल बचावले.
हिंगोली जिल्हयात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका ते मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पिक आडवे पडले असून संत्रा, मोसंबी तसेच आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे या फळपिकांचा सडाच शेतात पडला आहे.
अशी घडली घटना
दरम्यान, मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण व पाऊस सुरु असल्यामुळे शिंदेवाडी येथील शेतकरी विलास गव्हाणे हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह शिंदेवाडी शिवारात असलेल्या शेतात हरभरा पिक झाकण्यासाठी गेले होते. यावेळी गव्हाणे हे हरभरा पिकाच्या सुडीवर ताडपत्री झाकत होते तर त्यांची पत्नी व दोन मुले दुर अंतरावर काम करीत होती.
रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले
यावेळी अचानक विजेचा कडकडाट होऊन गव्हाणे यांच्या अंगावर विज कोसळली. यामध्ये ते गंभीररित्या भाजले गेले. या घटनेची माहिती त्यांच्या पत्नीने गावात दिल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीररित्या भाजलेल्या गव्हाणे यांना उपचारासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक मुपडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मयत गव्हाण यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.