आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा:पुरुष गटात मुंबई उपनगरला विजेतेपद, पुणे संघाला उपविजेतेपद

हिंगोली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथेमंगळवारी रात्री प्रकाशझोतात झालेल्या पुरुष गटातील अटीतटीच्या अंतीम सामन्यात मुंबई उपनगर संघाने पुणे संघाला एका गुणाने पराभूत करीत खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले तर पुणे संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

शहरातील रामलीला मैदानावर मंगळवारी ता 8 पुरुष गटातील 58व्या राज्यस्तरीय खो-खोच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघाने जोरदार प्रदर्शन करीत पुणे संघाचा एका गुणांनी पराभव केला. दरम्यान, अंतिम सामना पुणे विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात रोमहर्षक झाला .दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने लढत चुरशीची झाली. मुंबई उपनगर संघाने दोन्ही डावात डावात 19 गुण घेत आघाडीवर होता .तर पुणे संघाने तेवढ्याच आक्रमकतेने खेळ करीत दोन्ही डावात 18 गुण मिळविले. त्यामुळे पुणे संघाला एका गुणाने हा सामना गमवावा लागला. मुंबई संघाला केवळ एका गुणाने निसटता विजय मिळाला. तर ठाणे, व सांगली संघाला विभागून अनुक्रमे तिसरा व चतुर्थ क्रमांक देण्यात आला.

स्पर्धेसाठी पंच म्हणून श्रीकांत ढेपे, प्रशांत पाटणकर, किशोर पाटील, वीरेंद्र भुवड, नानासाहेब जांभळे, दीपक सपकाळ, शरद वानखेडे, नरेंद्र सुंदर, एजाज शेख, माधुरी कोळी , आदींनी परिश्रम घेतले. पुरुष गटातील अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.

विजेत्या व उपविजेत्या संघाला पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी माजी खासदार शिवाजी माने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापाळकर,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे, सचिन गोडबोले, अरुण देशमुख, पवन पाटील, प्रशांत इनामदार, नागनाथ गजमल, संतोष सावंत ,हिंगोली तालुका खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख, सचिव प्रा. नरेंद्र रायलवार, संजय भुमरे, प्रा. शिवाजी वायभासे उपस्थित होते.

दरम्यान उस्मानाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष व महिला संघाची निवड करणारी निवड समितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये नागनाथ गजमल हिंगोली, प्रशांत देवळेकर रत्नागिरी, संदेश आंबे मुंबई, तर सुप्रिया गाढवे उस्मानाबाद आदींची निवड करण्यात आली.पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्र संचालन हरिभाऊ मुटकुळे यांनी केले तर आभार स्वागताध्यक्ष कल्याण देशमुख यांनी मानले.

अंतिम सामन्यात फटाक्यांची अतिषबाजी...

येथे सुरू असलेल्या 58 व्या राज्यस्तरीय खो-खो च्या महिला व पुरुष गटातील अंतिम सामन्यात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने प्रेक्षकातून उत्स्फूर्त पणे जल्लोष पहावयास मिळाला.

बातम्या आणखी आहेत...