आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा:पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे ठाणेदारांना आदेश, दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर लक्ष

हिंगोली | प्रतिनिधी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात होळी व धुलीवंदनाच्या दिवशी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही यासाठी स्थानिक पोलिसांनी सतर्क रहावे, दारु पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हयातील ठाणेदारांना शनिवारी दिले.

हिंगोली जिल्हयात होळी व धुलिवंदनाच्या दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस दल सतर्क झाले आहे. या पार्श्वभुमीवर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ठाणेदारांशी संवाद साधला आहे. जिल्हयात या कालावधीत संवेदनशील भागात वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवावा. त्यासाठी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली जाणार आहे. ठाणेदारांनी मागणी केल्यास त्यांच्याकडे बंदोबस्त पाठविला जाईल. या शिवाय आवश्‍यक त्या भागात छायाचित्रीकरण करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

हिंगोली शहरासह जिल्हयात मोठ्या शहरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर लक्ष ठेऊन कुठे गोंधळाची परिस्थिती असेल तर तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणावी. दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. या शिवाय दुचाकीसह तीन चाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करून अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी. शहर वाहतुक शाखा तसेच जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांनी वाहतुक व्यवस्थेवर लक्ष ठेवावे. दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची ब्रिथॲनालयझद्वारे तपासणी करून कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

दरम्यान, नागरीकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावी, कुठेही अनुचीत प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...