आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांना गुरुवारी ता. 26 ध्वजारोहण करू देणार नाही, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा तसेच मागील वर्षीचे पीक विम्याचे 13 कोटी 89 लाख रुपये देण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर मागील आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी उपोषणात सहभाग नोंदवला आहे.
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यात भगवती येथे जलसमाधी आंदोलन झाले. तसेच गोरेगाव येथे रस्त्यावर दूध फेकण्यात आले तर गोरेगाव जिंतूर मार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. याशिवाय सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील 33 उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच हिंगोली येथील आगारामध्ये बसवर दगडफेक झाली ही दोन्ही आंदोलने पाठिंब्यासाठी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान आज स्वाभिमानीचे वाशिम जिल्हाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी उपोषण स्थळी भेट दिली, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या आदेशावरून आपण हिंगोलीत आलो असून त्यांनी दिलेल्या सूचनेवरूनच पुढील आंदोलन केले जाईल. पिक विम्याचा प्रश्न गुरुवारी तारीख 26 सकाळपर्यंत निकाली न काढल्यास गोरेगाव येथील उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेले जाईल. यासोबतच पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा यावेळी इंगोले यांनी दिला. दरम्यान यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.