आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्डीमोड परिसरात रस्ता रोको आंदोलन:हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प; राष्ट्रीय महामार्गावर शामियाना टाकून व ट्रॅक्टर आडवे लावून रास्ता रोको आंदोलन

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड ते कोंढुर डिग्रस या 8 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील 3 गावातील गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी सोमवारी तारीख 2 सकाळी राष्ट्रीय महामार्गावर शामियाना टाकून तसेच ट्रॅक्टर लावून रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड ते डिग्रस कोंढुर हा 8 किलोमीटर अंतराच्या मार्गावर चींचोर्डी, डिग्रस, कोंढुर ही प्रमुख गावे येतात. दररोज या भागातील सुमारे 3 ते 4 हजार गावकरी कळमनुरी किंवा आखाडा बाळापूर येथे खरेदीच्या निमित्ताने किंवा बाहेरगावी प्रवासाच्या निमित्ताने येतात.

मात्र या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे मागील 6 ते 7 वर्षात या रस्त्याची वेळोवेळी दुरुस्ती झाली मात्र अत्यंत थातूरमातूर पद्धतीने रस्ता दुरुस्त करण्यात आल्याने अवघ्या सहा महिन्यांमध्ये तर रस्त्याचे पुन्हा हाल झाल्याचा आरोप गावकऱ्यातून केला जात आहे.

दरम्यान या रस्त्याच्या बांधकामासाठी परिसरातील तीन गावातील गावकऱ्यांनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर सकाळी शामियाना टाकून तसेच मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात शेकडो गावकरी सहभागी झाले होते. माजी खासदार शिवाजी माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व आंदोलनाला पाठिंबा दिला.

या आंदोलनामुळे हिंगोली व नांदेड मार्गाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार सुरेखा नांदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हनुमंते, गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांच्या पथकाने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पुढील आठ दिवसांमध्ये रस्त्याच्या कामासाठी तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेऊन काम सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...